Tuesday, October 19, 2010

तीन पैशाचा तमाशा

माध्यमांमुळे राष्ट्रकूल सर्धेच्या त्रुटी उजेडामध्ये आल्या. आता यापुढचा प्रवास आयोजन समितिने आरोप नाकारणे, अंशत: मान्य करणे, सबबी सांगणे, कनिष्ठ अधिकार्‍यांचा बळी, सरकारचा दिखाऊ हस्तक्षेप, संसदेमध्ये गदारोळ, देखरेख करण्यासाठी संसदीय समितीची नेमणूक, एखाध्या निवृत्त न्यायाधीशांची 'भ्रष्टाचाराची शहनिशा' करण्यासाठीची एक समिती, तिचा अहवाल अशी नेहमीची वळणं घेत होईल. या आणि अशा प्रकरणांमधील खरी मेख अशी की हा भ्रष्टाचार कुण्या एका व्यक्तीच्या आवाक्यातील गोष्ट नाही. या सर्व प्रकाराला सुसंघटित भ्रष्टाचाराचे स्वरूप येत चालले आहे. भारताच्या राजकारनाची हीनतम पातळी हे राष्ट्रकूल स्पर्धांच्या भ्रष्टाचाराचे खरे करण आहे.इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजासाठी वेगवेगळ्या खात्यांकडून परवानगी आवश्यक असणार. संयोजन समिती ही एक प्रकारची समन्वय समितिच होती. तिला इतर खात्यांचे पाठबळ असल्याशिवाय इतकी 'मजल' मारणे शक्यच नव्हते. तसेच, ३८ कोटींचे फ़ुगे किंवा असे अनेक अनाकलनीय खर्च मंजूर केलेच कसे आणि नंतर महालेखाकार कार्यालयाने याचे परीक्षण डोळे झाकून केले की काय?एकंदरच स्पर्धेच्या ढिसाळ आयोजनाची जबाबदारी एका व्यक्तीच्या किंवा समितीच्या माथी न मारता सरकारच या बाबतीत दोषी आहे, हे पक्के ध्यानात ठेवायला हवे. यापुढे तरी चिखलफ़ेक थांबवून उरलीसुरली अब्रु वाचवायचा प्रयत्न सरकारने करावा, एवढीच आमची माफ़क अपेक्षा आहे!
- Yogesh Parale

Saturday, October 16, 2010

...एक वाया गेलेली नवकथा...

कोणे एके काळी एक आटपाट शहर होते. "येथे दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळेल'' अशी पाटी त्या नगरीच्या प्रवेशद्वारावरच लावलेली होती. पंचक्रोशीत त्या नगरीचे नाव होते. अगदी दूरवरून ज्ञानार्जनाच्या हेतूनं पाहुणे-रावळे येथपर्यंत प्रवास करीत असत. त्यानंतर नगरीचे वातावरण हळूहळू बदलायला लागले. पूर्वी येथे एकाच प्रकारचे शहाणे मिळत असत. आता शहाणपणाचे निरनिराळे प्रकार दिसायला लागले.
त्याच नगरीमध्ये एक आश्रम होता. आधीच हुशार असलेल्या समाजामध्ये कोण काय करतंय, या खासगी बाबींमध्ये लक्ष घालण्याचे प्रशिक्षण तेथे दिले जात असे. शहराप्रमाणेच या आश्रमाचंही नाव त्रिखंडात गाजत होते. सर्व काही सुरळीत चालू होते.
एके दिवशी अचानक त्या ज्ञानप्रभूंच्या नगरीमध्ये उत्सवांचं वातावरण निर्माण झाले. तत्कालीन उत्सवप्रिय समाजाचा याला पाठींबाच मिळाला. झाडून सगळ्या प्रतिष्ठित वर्गानं एक परिपत्रक काढून याचा निषेध केला. पण नगरीतल्या युवा वर्गाला हे उत्सवांचं वातावरण हवे होते. हळूहळू पंचांगातले सारे सण सार्वजनिक करण्याची पद्धत सर्वमान्य होऊ लागली. यातून आश्रमही सुटले नाहीत. झाडून सगळ्या आश्रमांमधून उत्सवी वातावरण तयार केले जाऊ लागले. ज्येष्ठ ज्ञानतपस्वींनी याचा क्षीण निषेध करून पाहिला. पण त्यांचे सारे प्रयत्न निष्फ़ळ ठरले. यातून एक आश्रम लांब राहिला होता. पण काळाच्या ओघात तोही या उत्सवांकडे ओढला गेला. या आश्रमात एकदा समारंभपूर्वक दह्याची चोरी करण्यात आली. सदर प्रसंगी अनुयायांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तेव्हाच या क्षणाची चाहूल लागली. त्यानंतर मधल्या काळामध्ये विघ्नहर्ता दहा दिवसांसाठी नगरीत मुक्काम करून गेले. त्यानंतर मात्र सगळ्यापासून अलिप्त राहिलेला आश्रमही या धामधूमीत सापडला. ज्ञानार्जनाचे काम होणार्‍या आश्रमांमध्ये उत्सवी वातावरण झालं आणि या आटपाट नगरीमधल्या आणखी एका आश्रमाचा बळी गेला.
[स्टेजवर अंधार]
टीप: वरील नवकथा पूर्णत: काल्पनिक असून कुठल्याही वास्तवाशी संबंध नसू शकेल. प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर हा संबंध लावावा. होणार्‍या नुकसानीस व्यवस्थापन, लेखक किंवा इतर कुणीही, कसल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
सूचना: या कथेतील एका वाक्याचा दुसर्‍याशी संबंध असेलच, असे नाही. असे का, म्हणून विचारू नये.
आणखी एक सूचना: [स्टेजवर अंधार] या वाक्याचा संबंध काय, याचे उत्तर मिळणार नाही. संजय लीला भन्साळी किंवा सुदर्शनवर काम करणार्‍याला किंवा मराविमंला विचारावे.
आ. ए. सू. : मूळ कथेपेक्षा सूचनाच जास्त झाल्याचे वाटत असले, तर ते सांगू नका. कुणीही ऐकणार नाही.
सर्व हक्क स्वाधीन: गौरव दिवेकर, उप-सचिव, अखिल भार्तीय बाल-तरूण सहकार मित्रमंडळ, मौजे-बुद्रूक
' आमचे येथे सगळे सण यथास्थित साजरे करून मिळतील'